आंबेडकर Live

मी बुद्धाकडे का वळलो?

माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले. माझ्या लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्मजीवनातही काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते, त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचून काढली होती. त्याच बरोबर रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण – महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणा-या लोकांना, तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला सांगत. हा प्रकार बरीच वर्षे सुरू होता.

मी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली. पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती. शिवाय एक परीक्षा पास होण्यापलीकडे मी विशेष काय केले होते? माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळुसकरांकडे गेली. केळुसकरांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळविले. ते या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले. दादा केळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते. त्या वेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले. मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगांनी अक्षरश: भारावून गेलो. माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बौद्ध वाङ्मयाचा परिचय का घडवून दिला नाही असे मला वाटले. मी त्यांना सरळच विचारले की, ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रीय यांचा गौरव आहे व शूद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ तुम्ही मला वाचावयास का सांगितले? माझ्या वडिलांना माझा प्रश्न रूचला नाही व मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. ‘ असे म्हणून त्यांनी मला गप्प केले.

माझे वडील स्वत: ची हुकूमत गाजविण्याच्या वृत्तीचे होते. पण तरीही मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना याबाबत विचारले त्या वेळी ते म्हणाले, “आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण आणि कर्ण ही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोचली, हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला. त्यामुळेच तुझा न्यूनगंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण-महाभारत वाचावयास सांगितले. ‘मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले. माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेच तथ्य होते. पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तीरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दांत सांगितले. मी म्हटले, “मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाहीत. भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात, तर कृष्णाला लांडीलबाडी करण्यास संकोच वाटला नाही. त्याचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरलेले आहे. तसेच मला रामही आवडला नाही. त्याची शूर्पणखेशी वागणूक पाहा, काली – सुग्रीव प्रकरणात त्याची वर्तणूक पाहा आणि सीतेला त्याने दिलेली क्रूर वागणूक पाहा.”

माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप राहिले. ते त्यावर काहीच बोलले नाहीत. माझ्या मनात बंड उद्भवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो. त्याच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही, तर निश्चित मनाने मला बुद्धाने भुरळ घातली. इतर व्यक्तिरेखांशी साम्यभेदाने त्या वयातही बुद्ध मला आवडला.

‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ याविषयीची माझी उत्सुकता अशी लहानपणापासून निर्माण झालेली आहे. हे पुस्तक लिहिण्याची माझी प्रेरणा मला निराळ्या कारणांनी मिळाली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुखपत्राच्या संपादकांनी १९५१ साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की, विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारील असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याविना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले आहे की, या आधुनिक जगात बुद्धधर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करू शकेल.

बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत सावकाश झाली, याचे कारण त्याचे वाङ्मय इतके आहे की ते कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्याचा स्वत:चा असा बायबलसदृश ग्रंथ नाही . मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्रांने कळविले. त्या पत्रानुसार मी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले. हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे, असा माझा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचारांचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल, असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दांत मांडले आहे.

बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी जी तीन पुस्तके आहेत त्यांपैकी हे एक पुस्तक. इतर दोन पुस्तके आहेत (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. हे ग्रंथ मी वेगळे लिहून प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे.

संदर्भ : माझी आत्मकथा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

7 Replies to “मी बुद्धाकडे का वळलो?

  1. Buddha Ani dhamma khup Chan book ahe sir..jivna mde parivartan ghadhun Anya sathi ya vicharancha khup prabhav pdto.. thanks sir.

    1. BUDDHA and his DHAMMA . He book Nasun te DHAMAM GRATH AAHE . Sapurn manav jaticha tya Grantham Made SARV sukacha Ndyan Samavalela Aahe jo tyala sparsh Karel tyancha Aayushacha Sona Hoil. Namo Buddhay Jai Bhim 🌹🌹🌹👏👏👏

  2. खरोखरच सुभेदारांनी बाबासाहेबांना किती मोलाचं शिक्षण दिले त्यातून भीमराव घडले
    धन्य ते माता पिता…

  3. बाबा तर बाबाच होते नाहि कोनी होनार ना कोनी त्यांच्यासारख जगनार जय भिम बाबा

  4. होता भिमराव लय दिलदार।
    तुला फुकाट दिलय सार ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *