इतिहास

अजिंठा लेणींतील १५०० वर्षांपूर्वी रंगवलेली चित्रे आजही का टिकून आहेत? इतिहास जाणून घ्या!

अजिंठा लेणींतील चित्रकारीमध्ये वापरलेले रंग हे निसर्गनिर्मित पाने-फुले, रंगीबेरंगी माती, दिव्याची काजळी, चुना यापासून तयार करत असत. ज्या लेणींमधील चित्रकारीमध्ये निळा रंग दिसून येत नाही, त्या लेणी या सर्व पाचव्या शतकापूर्वीच्या आहेत. आणि जेथे निळा रंग वापरलेला दिसून येतो, ती चित्रकारी ही पाचव्या शतकानंतरची आहे. कारण हा जो निळा रंग वापरला, तो इराण-आशिया मायनर येथून खनिजस्वरुपात आयात करण्यास सुरुवात ही सहाव्या शतकापासून झाली. हे खनिज अत्यंत महागडे असल्याने, लेणींमधील चित्रे रंगविण्याकरीता अत्यंत दुर्मिळ ,असा त्याचा वापर करण्यात आलेला आढळतो. या खनिजाला ‘ लेपिझ लॉझ्युली ‘ असे शास्त्रीय नाव असून, त्यालाच ‘ पर्शियन ब्ल्यू ‘ असेही म्हणतात.

चित्रे रंगविण्याकरीता वेगवेगळ्याप्रकारच्या प्लास्टरचा वापर केलेला आढळून येतो. Mud plaster, Shell plaster, आणि Lime plaster असे ते प्लास्टर चे प्रकार आहेत.Mud plaster तयार करतांना नदीच्या पात्रातील, पूर येऊन गेल्यानंतर तो ओसरल्यावर, पात्रात जी चिकनमाती उरते, त्या मातीत शेण, गव्हाचा गव्हंडा, भाताचे तूस, बेलाची पाने व फळे यांचे मिश्रण करुन, ते एकजीव होईपर्यंत मुरवून ठेवत असत, मग त्याचा गिलावा भिंतीवर देऊन, त्यावर रंगलेपन करत असत. या पद्धतीला ‘ फ्रेस्को ‘(Fresco) पद्धती म्हणतात. तर, Shell plaster हे नदीतील शंख-शिंपले सावलीत वाळवून , त्यांची वस्त्रगाळ पूड करुन, लेणींच्या भिंतीवर शंखाने घोटून, गुळगुळीत करुन ते प्लास्टर केले जाई. प्लास्टर ओले असतांना, त्यावर वनस्पतीजन्य व मातीपासून बनवलेल्या रंगांनी चित्र काढण्याच्या पद्धतीला ‘टेम्परा ‘( Tempera )असे म्हणतात. तर Lime plaster हे चुना व बारीक रेती एकत्र मिसळून तयार करीत. अशा प्रकारे त्यावर केलेले रंगभरण म्हणजेच ‘ टिस्को ‘( Tisco ) पद्धत म्हणतात.

रंगभरण, अथवा रंगलेपण करण्यासाठी जे कुंचले (ब्रश ) तयार केले जात असत, ते कोल्ह्याच्या शेपटीच्या केसांचे, अथवा मुंगसाच्या केसांपासून तयार करत असत, आणि त्यांचा आकार हा पिंपळाच्या व वडाच्या अंकुरासारखा असे. पिंपळाच्या अंकुरासारख्या लांबट आकाराच्या कुंचल्याने चित्रातील नाजूक रेषा, नाक, डोळे, पापण्या, भिवया व केस ,तसेच वस्त्रावरील नक्षीकाम व अंगावरील दागदागिने चितारीत असत, तर वडाच्या अंकुरासारख्या आखुड आकाराच्या कुंचल्याने चित्रातील इतर रंगकाम , अथवा रंगभरण केले जात असे, तर चित्राची पार्श्वभूमी व त्यातील रंगलेपनासाठी जो सपाट आकाराचा कुंचला वापरला जाई, तो ‘ पलाशवृक्षाच्या ‘(पळसाच्या ) मुळीला ठेचून, तिच्यापासून निघणाऱ्या तंतूंपासून बनवला जाई.

आजही उन, वारा पाऊस,हवेतील आर्द्रता यांचा सामना करत ही चित्रे टिकून आहेत. अर्थात, काळाचा परिणाम कोणावर होत नाही….? हजारो वर्षांच्या काळावर मात करुन ही चित्रे प्रदीर्घकाळ टिकून राहावीत, त्यांना वातावरणातील जीवजंतूंपासून उपसर्ग पोहचू नये, किड, वाळवी यांच्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून ही चित्रे रंगवितांनाच त्यांत गांजा व भांग या मादक पदार्थांचे संमिश्रण केले असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे.

अजिंठ्यातील दिडहजार वर्षांपूर्वी त्या अनामिक चित्रकारांनी रंगवलेली चित्रे आजही, जशीकाही आताच रंगवली आहे, इतकी “फ्रेश” वाटतात, की मनोमन त्या अनामिक कारागिरांना वंदन केल्याशिवाय राहवत नाही……!

– अशोक नगरे
मोडी तज्ज्ञ, धम्म लिपी ब्राह्मी, व धम्मभाषा पाली अभ्यासक, बौद्ध लेणी,
बौद्ध शिल्पकला, व बौद्ध इतिहास अभ्यासक, पारनेर, अहमदनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *