आंबेडकर Live

भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल?

घटनेचे काय होईल? लोकशाहीचे काय होईल? या प्रश्नावर आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल? यावर आपले मत मांडले. ऍड.बी.सी.कांबळे यांच्या समग्र आंबेडकर-चरित्र (खंड २४वा) पुस्तकातील हा महत्वाचा मजकूर….

लोकशाही पुन: जाईल काय?
बाबासाहेबांचे हे दुःख होते की, भारत पूर्वी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य गमावून बसला होता, ‘त्याप्रमाणे भारत लोकशाहीही गमावून बसला आहे. तेव्हा पुन: भारत लोकशाही गमावून बसेल काय? त्याचे उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले, मला माहीत नाही. त्यावर पुढे डॉ.बाबासाहेब पुढे म्हणाले , .. “परंतु एक गोष्ट भारतासारख्या देशात शक्य आहे. ती गोष्ट ही की, भारतात लोकशाहीचा वापर कित्येक वर्षे नसल्यामुळे ही काही तरी नवी चीज वाटण्याचा संभव असून लोकशाहीची जागा हुकूमशाही घेण्याचा धोका आहे. आज भारताची लोकशाही नूतन बालक आहे. कदाचित लोकशाहीचे रूप वरकरणी राहील आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीत हुकूमशाही नांदेल हे शक्य आहे. दुसऱ्या प्रकारचा धोका तर जरूर आहे.”

“खरी लोकशाही हवी असेल तर…
भारतात खऱ्याखऱ्या स्वरूपात लोकशाही नांदावयाची असेल तर आपण काय केले पाहिजे, याबाबतीतही बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केले. लोकशाहीसाठी आपण ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या त्यांनी सांगितल्या.

पहिली गोष्ट
त्या सांगताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “आपण पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, आपली सामाजिक अगर आर्थिक उद्दिष्टे प्राप्त करुन घेण्यासाठी आपण घटनात्मक मार्गाचाच कटाक्षाने अवलंब केला पाहिजे. आपण रक्तरंजित क्रांतीचा मार्ग वर्ण्य केला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. जर आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे प्राप्त करून घेण्यासाठी घटनात्मक मार्गच उरला नाही तर बेसनदशीर मार्गाचा अवलंब करणे समर्थनीय ठरू शकेल. परंतु जेथे घटनात्मक मार्ग खुले आहेत, तेथे बेसनदशीर मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. बेसनदशीर मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जेवढ्या लवकर असे मार्ग वर्ज्य करता येतील तितके ते भारताच्या हिताचे आहे.’

करावयाची दुसरी गोष्ट
लोकशाहीसाठी करावयास हवी अशी दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली ती ही की, ”एखादा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्प नका. अगर त्याजवर इतका विश्वास टाकू नका की त्यामुळे तो लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलून टाकील. हा इशारा मिलने दिला होता. एकाद्या थोर पुरुषाने जीवनभर देशसेवा केली असेल, तर त्याबद्दल कृतज्ञ रहाण्यात काहीही चूक नाही. परंतु कृतज्ञतेस मर्यादा आहेत. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉग्नेल यांनी कृतज्ञतेबद्दल म्हटले आहे. की, आपला स्वाभिमान विकून एखाद्या मनुष्यास कृतज्ञ रहाता येणार नाही की एखाद्या स्त्रीला आपले चारित्र्य विकूम कृतज्ञ रहाता येणार नाही, अगर एकाद्या राष्ट्राला आपले स्वातंत्र्य विकून कृतज्ञ रहाता येणार नाही. इतर देशापेक्षा भारताला या इशाऱ्याची फार जरुरी आहे.

भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की, इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व अशी व्यक्तिपूजा कोठेही आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पाताचा व पर्यायाने हुकूमशाहीचा खात्रीलायक मार्ग होतो.”

सामाजिक लोकशाहीही हवी
बाबासाहेब पुढे म्हणाले, “आपण तिसरी गोष्ट केली पाहिजे ती ही की, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट न रहाता, आपल्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाहीवर भक्कमपणे आधारल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकत नाही.”

सामाजिक लोकशाही म्हणजे काय?
सामाजिक लोकशाही म्हणजे काय याचेही स्पष्टीकरण करताना बाबासाहेब पुढे म्हणाले,… “समता, स्वातंत्र्य व विश्वबंधुत्व या तत्त्वावर आधारलेला जीवनमार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही. ही तीन तत्त्वे वेगवेगळी मानता कामा नये. त्यांचा त्रिवेणी संगम आहे.

मूळ तत्त्वास सुरुंग
त्यापैकी एक तत्त्व दुसऱ्या तत्त्वापासून वगळणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ हेतूस सुरुंग लावण्यासारखे आहे. समतेपासून स्वातंत्र्याची काडीमोड करता येणार नाही की, स्वातंत्र्यापासून समतेची फारकत करता येणार नाही, किंवा स्वातंत्र्य व समता ही दोन्ही विश्वबंधुत्वापासून अलग करता येणार नाहीत. समता नसेल तर केवळ स्वातंत्र्यामुळे मूठभर लोकांचा वर्ग सत्ताधारी बनेल. स्वातंत्र्याशिवाय समता असेल तर व्यक्तीचा स्वत:हून प्रथम काम करण्याचा हुरूप मारून टाकला जाईल. विश्वबंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य व समता योग्य मार्गाने जाणार नाहीत, कारण त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस बळाचा उपयोग करावा लागेल.”

त्यावेळच्या भारताचे वर्णन
त्यावेळच्या भारताच्या स्थितीचा उल्लेख करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “भारतीय समाजात आज दोन गोष्टी नाहीत हे मान्य करुन आपण सुरवात केली पाहिजे. त्यापैकी एक जरुरीची गोष्ट म्हणजे समता. सामाजिकदृष्ट्या भारतीय समाज विषमतेच्या तत्त्वावर उभारलेला आहे. ते विषमतेचे तत्त्व असे… काही जणांना उच्च स्थान तर काही जणांना नीच स्थान अशा प्रकारचे आहे.”

आर्थिकदृष्ट्या…
आर्थिकदृष्ट्या भारताचे वर्णन करताना ते म्हणाले, “भारतीय समाज आर्थिकदृष्ट्या असा आहे की, काही जणाकडे अमाप संपत्ती आहे; तर कित्येक कोट्यवधी लोक महाभयंकर दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी आपण परस्परविरोधाने भरलेल्या जीवनात पर्दापण करणार आहोत. राजकारणात आपल्याला समता असेल. एक मनुष्य, एक मत, एक किंमत हे तत्त्व राजकारणात आपण मान्य करीत आहोत. परंतु सामाजिक रचनेमुळे, सामाजिक व आर्थिक जीवनात, एक मनुष्य, एक किंमत हे तत्त्व नाकारण्याची आपली क्रिया अशीच पुढे चाल रहाणार आहे.”

परस्परविरोधी जीवन
अशा परस्परविरोधी जीवनाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, “हे परस्परविरोधी जीवन आपण किती दिवस चालविणार आहोत? आपण हे परस्परविरोधी जीवन फार काळ चालविले तर राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणू. ही विसंगती लवकरात लवकर आपण दूर केली पाहिजे. नाहीतर होरपळून निघालेले लोक लोकशाही उडवून देतील.”

संदर्भ :
समग्र आंबेडकर – चरित्र ( खंड २४ वा )
लेखक : ऍड.बी.सी.कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *