जगभरातील बुद्ध धम्म

इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थचे घर होणार बौद्ध विहार

इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे व शिलर, तसेच रशियाचा पुष्किन या प्रतिभावंत साहित्यिकांमुळे त्या त्या देशातील लोकांचे जीवन पिढ्यान्पिढ्या व्यापून गेले आहे. विल्यम शेक्सपिअर यांच्याप्रमाणे विल्यम वर्डस्वर्थ या रोमँटिक आणि सौंदर्यवादी कवीचा दबदबा देखील इंग्रजी साहित्यात आहे. पाच भावंडात त्याचा नंबर दुसरा होता. वडील जॉन वर्डस्वर्थ मुलांना कविता शिकवीत, त्यामुळे त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. सन १७८७ मध्ये केम्ब्रिज येथे शिकत असताना विल्यमने पहिले सुनीत ( Sonnet ) लिहिले. हळूहळू ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची लहान बहीण डोरोथी हिला देखील काव्याची आवड होती व ती देखील कवियत्री झाली. त्यावेळी झालेल्या फ्रान्स व इंग्लंड मधल्या तणावामुळे ते बायको आणि मुलीला सोडून इंग्लंडला परत आले.

त्यांच्या मुलीचे नाव कॅरोलीना होते. मुलगी व बायको याची त्यांना खूप आठवण येत असे. मुलीवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. १७९३ मध्ये त्यांचे ‘ऍन इविनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचेस’ नावाचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १७९५ साली त्यांची कॉलरीज यांच्याशी ओळख झाली. दोघे घनिष्ठ मित्र बनले व त्या दोघांनी मिळून Romantic Movement हा कवितासंग्रह लिहिला. तसेच त्यांची गीतगाथा (Lyrical Ballads)आज उत्कृष्ट कलाकृती मानली जाते. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त स्वरूपात रचण्याची किमया वर्डस्वर्थने केली. हाच ‘सुनीत’ काव्यप्रकार मराठीत रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील अनेक कवींनी केले. त्यामध्ये माधव ज्युलियन, कवी बी, केशवसुत असे दिग्गज कवी होते. केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले ) यांची कविता ‘आम्ही कोण’ ? हे सुप्रसिद्ध सुनीत काव्य होते. आणि त्याचे केशवकुमार (आचार्य अत्रे) यांनी केलेले विडंबन हे सुद्धा चौदा ओळींचे सुनीत काव्य होते.

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वर्डस्वर्थ यांच्या टुमदार घरापाशी एक तळे होते. त्या तळ्यातील डॅफोडिल्स फुले ते वारंवार बघत. मेघ होऊन आसमंतात व पर्वतावर फिरावे. आकाशातून तळ्यातील सोनेरी डॅफोडिल्स फुले न्याहळावीत अशी कवी कल्पना त्यांच्या काव्यातून दिसून येते. आणि ती त्यांनी अतीशय वेगळ्या आणि मधुर भाषेत अशी रचली की अजरामर होऊन गेली. त्यांची काव्यसंपदा ज्या निसर्गरम्य ऍलफॉक्सटॉनच्या उद्यान घरात उदयास आली ते घर म्हणजे इंग्लंडच्या साहित्यिक वर्तुळात ऐतिहासिक ऐवज होते. परंतू वर्डस्वर्थ नंतर कालांतराने त्या घराची बुज राखली गेली नाही. तेथे एक हॉटेल सुरू झाले. एका जगप्रसिद्ध कवीची ही मोठी थट्टा होती. परंतु पुढे तेथील असोसिएशनने ते हॉटेल बंद पाडले. व ती जागा जेव्हा विकण्यास काढली तेंव्हा एका बौद्ध संस्थेने नुकतीच ती १.४ मिलियन पाउंडला विकत घेतली.

अलौकिक निसर्गरम्य शांतता लाभलेल्या या घराचे रूपांतर आता बौद्ध ध्यान साधना केंद्रात होणार असून वर्डस्वर्थच्या निसर्गरम्य सप्तरंगी कवितेला आता खरा न्याय मिळेल अशी आशा तेथील सर्वजण व्यक्त करत आहेत. ऍलफॅक्सटॉन पार्क ट्रस्ट चॅरीटीचे ट्रस्टी धम्मचारी लोकबंधू यांनी सांगितले की आता सुंदर व ऐतिहासिक साहित्याचा वारसा लाभलेल्या या वास्तूची आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ आणि उपयोगात आणू. अभिजीत कला उगमाचे स्थळ असलेल्या या वास्तुचे नुतनीकरण ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होईल. तेव्हा वर्डस्वर्थची साहित्यिक कलाविश्व वास्तू साधकांच्या ध्यानसाधनेने अधिक उजळून निघेल.

संदर्भ लिंक — https://bbc.com/news/uk-england-somerset-53613222

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *