औरंगाबाद: प्रबुध्द कुटुंबाची व पर्यायाने प्रबुध्द भारताची निर्मिती करण्याचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद एक माध्यम ठरावे, असे या परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे जेष्ठ सनदी अधिकारी व या परिषदेचे प्रमुख संयोजक डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी शनिवारी आयोजित महिलांच्या सभेत सांगितले.
पीईएसच्या सभागृहात झालेल्या या सभेस हजाराहून अधिक धम्मसेविका उपस्थित होत्या. मंचावर कमल मनोरे, उर्मिला ओहोळकर, गुणप्रिया गायकवाड, दैवशीला गवंदे , डाॅ. वाल्मिक सरवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ.कांबळे म्हणाले की, सारा भारत बौध्दमय करण्याचे स्वप्न डाॅ. बाबासाहेबांनी पाहिले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी आता आम्ही सिध्द झाले पाहिजे. मुळात बौध्द धम्म हा प्रत्येकाच्या आचरणात उतरला पाहिजे. त्यातून कुटूंब व पुढे समाज व नंतर देश या प्रबुध्द होण्याच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतो.
जगभरातील बौध्द राष्ट्रात डाॅ. बाबासाहेब धम्म परिषदेनिमित्त जात तेव्हा ते तेथील बौध्द उपासकांनी भारतातील बौध्द उपासकांना धम्म मार्गावर चालण्यासाठी मदत करावी असे आवाहन करीत, अशी आठवण सांगून डाॅ. कांबळे म्हणाले, या जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने अनेक बौध्द देशातील भिक्खू व विचारवंत शहरात येत आहे. या शहरात बौध्द संस्कृती वसते आहे, याची ओळख आपण त्यांना करून द्यावी.
डाॅ. वाल्मिक सरोदे यांनी परिषदेच्या निमित्ताने शहरातून रविवारी सकाळी 9वाजता निघणार्या समता वाहन फेरीत सहभागी होण्याचे आवाहन केलं. तसेच पांढराशुभ्र वस्त्र आणि हेल्मेट घालून रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या तीन दिवसाच्या परिषदेत महिलांची भूमिका व जबाबदारी ही त्यांनी समजावून सांगितली.