ब्लॉग

भिक्खू ह्यूएन-त्संग यांच्या खडतर प्रवासावरील चित्रपट

चीन मधील पौराणिक साहित्यातून ‘पश्चिमेचा स्वर्ग’ म्हणजेच भारताबद्दल बरेच काही लिहून ठेवलेले आहे. चिनी लोकांना भारताबद्दल आदर वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे हा देश शाक्यमुनी गौतम बुद्धांचा आहे. याच देशात त्यांचा जन्म झाला. येथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि येथेच मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी धम्मज्ञान दिले.

इ.स.६७ पासून चीनमध्ये बौद्ध धम्माच्या प्रचाराचे काम सुरू झाले. तेव्हापासून धर्मप्रसारासाठी अनेक भारतीय बौद्ध तेथे गेले, त्याचप्रमाणे ग्रंथ प्राप्तीसाठी आणि पवित्र स्थळांचे दर्शन घेण्यासाठी अनेक बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आले. फा-हियान, ह्यूएन-त्संग आणि इत्सिंग या भिक्खूंनी भारतात दीड हजार वर्षांपूर्वी प्रवास केला. त्यांच्या प्रवासवर्णनातून त्यांनी बाळगलेली जिद्द, बुद्धांचा घेतलेला ध्यास आणि अपार श्रद्धा दिसून येते.

ह्यूएन-त्संग हे चीनचे भिक्खू इ.स.६२९ ते इ.स. ६४५ या काळात भारतात आले होते. चीनमधून मोठा खडतर प्रवास कधी घोड्यावरून तर कधी पायी चालत त्यांनी केला. वाटेत कधी पहाडात, नदीकिनारी, वाळवंटात मुक्काम केला. आलेली अनेक संकटे झेलली पण माघार घेतली नाही. इथे आल्यावर अनेक बौद्ध स्थळें, विहार, स्तूप, संघाराम बघितले.

नालंदा येथे राहून संस्कृत मधील अनेक बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला. आणि मग १६ वर्षांनी परत भारतातून आपल्या मायदेशी परतले. जाताना संस्कृत मधील बौद्ध ग्रंथ, बुद्ध उपदेशांची हस्तलिखिते, राजे लोकांच्या भेटी, वस्त्रे, बुद्धांच्या मुर्त्या व इथल्या आठवणी नेल्या. त्यावरूनच त्यांनी भारतात केलेल्या प्रवासाचे वर्णन चीनी भाषेत इ.स.६४८ मध्ये लिहून पूर्ण केले. म्हणून आज आपणास भारतातील ५ व्या आणि ६ व्या शतकातील धम्माचा सुवर्णकाळ ज्ञात होत आहे.

सप्टेंबर २०१४ मध्ये China Film Co.Ltd आणि Eros International (India) यांनी ह्यूएन-त्संग यांच्या रोमांचकारी खडतर प्रवासवर्णनावर संयुक्तरीत्या चित्रपट काढण्याचे ठरविले. पंतप्रधान मोदी यांनी देखील सहमती दिली. आणि मग मोठ्या परिश्रमाने हा ऐतिहासिक चित्रपट पूर्ण करण्यात आला.

दिनांक २९ एप्रिल २०१६ रोजी ‘Xuan Zang’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. Best Foreign Language Film यासाठी चित्रपटाची निवड होऊन चीनतर्फे तो ऑस्करला पाठविला. परंतु नॉमिनेशन मिळाले नाही. पण म्हणून या चित्रपटाचे महत्त्व बिलकूल कमी होत नाही. ( ‘ह्यूएन-त्संग’ हे इंग्रजी लिपीत Xuan Zang असे लिहितात )

यास्तव सर्व बौद्ध अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, लेणी चाहत्यांनी, वाचकांनी आणि सर्व जाणकांरानी हा चित्रपट पहायलाच हवा. या चित्रपटातील अनेक स्थळे ( उदा.गोबीचे वाळवंट, अक्राळविक्राळ नद्या, डोंगरदऱ्या ) डोळ्यांची पारणे फेडतात. दीड हजार वर्षांपूर्वी ह्यूएन-त्संग यांनी केलेला प्रवास प्रेक्षक अक्षरशः जगतो. या प्रवासातील त्यांची बुद्धांप्रती असलेली श्रद्धा बघून डोळे नकळत भरून येतात.

जीवनाची क्षणभंगूरता कळते. निश्चितच हा चित्रपट अविस्मरणीय झाला आहे. फक्त नालंदा विद्यापीठ येथील दाखविलेली महायान पंथाची संस्कृत भाषेची पार्श्वभूमी खटकते. तरी कोरोनामुळे घरी बसलेल्यांनी इंग्रजी सबटायटल्स असलेला हा दोन तासांचा चित्रपट निवांतक्षणी कुटुंबासहीत आवश्य पहावा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *