ब्लॉग

चिनी प्रवासी ‘हुएनत्संग’ यांचे अलौकिक योगदान

चिनी भिक्खू हुएनत्संग यांनी भारतामधील १४०० वर्षांपूर्वी केलेल्या प्रवासाचे मला नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे. ते भारतात आल्यामुळे त्यावेळची भारतातील बौद्ध धम्माची स्थिती आणि स्थळें यांची अचूक माहिती त्यांच्या प्रवासवर्णनातून मिळते. ते ज्या मार्गाने आले तो मार्ग पुढे सिल्क रोड म्हणून नावाजला गेला. त्यांना मायदेश सोडून जाण्यासाठी चीनच्या सम्राटाने परवानगी दिली नव्हती, म्हणून भारतात काही वर्षे घालविल्यानंतर परत मायदेशी जाताना ते खोतांन शहरात थांबले आणि त्यांनी चीनच्या सम्राटाला अगोदर पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की “चीनमध्ये जो बुद्ध उपदेश पोहोचला होता तो अपूर्ण होता. त्याला पूर्णत्वाने जाणण्यासाठी मी अनेक संकटांना तोंड देऊन गुप्तरूपाने भारतात गेलो. मी विस्तृत वाळवंटातून, बर्फाने आच्छादलेल्या पर्वत शिखरावरून, अत्यंत धोकादायक घाटातून आणि भयंकर उष्ण हवेच्या प्रदेशातून प्रवास केला. निरनिराळ्या देशातील हजारो लोकांचे रीतिरिवाज आणि पेहराव पाहून तसेच अनेक संकटांना तोंड देऊन मी परत येऊन आपणांस वंदन करीत आहे. मी ग्रद्धकुट पर्वत पाहिला. बोधीवृक्षाची पूजा केली. तथागतांच्या अनेक स्थळांचे दर्शन घेतले, जी आपल्या देशातील पूर्वी कोणीही पाहिली नव्हती. अशी पवित्र वाणी ऐकली की जी पूर्वी कोणीही ऐकली नव्हती. आता अनेक बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करून अनेक ग्रंथ, बुद्धमुर्त्या आणि पवित्र बुद्धधातू घेऊन मी परत आलो आहे”.

चीन मधील शियान प्रांतात हा ‘जंगली हंस पॅगोडा’ आहे. भिक्खू हुएनत्संग यांनी भारतातून आणलेल्या ग्रंथांचे भाषांतर एकेकाळी इथे बसून केले.

हे पत्र वाचल्यावर सम्राटाला फार आनंद झाला. चीनच्या राजधानीपर्यंत हुएनत्संग यांच्या प्रवासाची सर्व तजवीज करण्याची त्यांनी आज्ञा केली. ज्या दिवशी हुएनत्संग राजधानीत पोहोचले, त्यावेळी तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तो दिवस राजधानीत सुट्टीचा दिवस मानण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. भिक्खू हुएनत्संग यांनी भारतातून आपल्याबरोबर अनेक मौल्यवान गोष्टी चीनमध्ये आणल्या. यामध्ये तथागतांच्या धातूंचे १५० अंश, मगध राज्यातील सोन्याची बुद्धमूर्ती, चंदनाच्या बुद्धमूर्ती, चांदीच्या बुद्धमूर्ती, ४ फूट उंच असलेली स्फटिका सारखी बुद्धमूर्ती, महायान पंथांचे २२४ ग्रंथ, स्थाविरवाद शाखेचे व विविध सूत्रांचे १५ ग्रंथ, संम्मतीय शाखेचे १५ ग्रंथ, सर्वस्तिवादी शाखेचे ६७ ग्रंथ, धर्मगुप्त शाखेचे ४२ ग्रंथ , हेतूविद्याशास्त्राचे ३६ ग्रंथ, असे मिळून ६५७ ग्रंथ वीस घोड्यावरून आणले. तरीही प्रवासात अनेक ठिकाणी नदीपार करताना अनेक ग्रंथांना व वस्तूंना जलसमाधी मिळाली.

चीन मधील फिलाई पर्वतावर लिगीन विहार आहे. त्याच्या समोर हुएनत्संगचे हे दगडी शिल्प.

हे सर्व पाहून चीनच्या सम्राटाने त्यांना दरबारात मानाची नोकरी बहाल केली. परंतु भिक्खू हुएनत्संग यांनी ती न स्वीकारता आपल्याबरोबर आणलेल्या ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरू केले. इ.स. ६४७ साली बोधिसत्वपिटक सूत्राचे, बुद्ध-भूमी शास्त्राचे, शतमुखी-धारणीचे आणि इतर काही ग्रंथांची भाषांतरे केली. इ.स. ६४८ साली त्यांनी आणखीन पंधरा ग्रंथांचे भाषांतर केले आणि सम्राटाच्या आज्ञेवरून “सी-यु-की” या नावाचे आपले प्रवासवर्णन लिहून काढले. सम्राट मरण पावल्यावर त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत आपला सर्व वेळ भाषांतराच्या कामात आणि धम्मप्रवचनाच्या कामात घालविला. त्यांनी एकूण ७४ ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केला. त्यातील एकट्या महाप्रज्ञापारमिता सुत्रातच दोन लाख सूत्रे आहेत. आपल्यानंतर हे भाषांतराचे काम अव्याहतपणे चालू राहावे म्हणून त्यांनी कर्तबगार आणि विद्वान भिक्खुंची शिष्यपरंपरा निर्माण केली.

१७.१४ मी. उंचीचे विरोचन बुद्ध शिल्प फेंगशानसी लेण्यांच्या आवारात आहे. इ.स. ६७५ मध्ये या लेण्या आकारास आल्या. सोबत शिष्य आनंद आणि काश्यप बोधिसत्व यांचे देखील शिल्प आहे.

इ.स. ६५२ साली भारतातील स्तुपाच्या आकारासारखा १८० फूट उंचीचा स्तूप त्यांनी उभारला. तेथे त्यांनी भारतातातून आणलेले मौल्यवान ग्रंथ, बुद्धप्रतिमा, बुद्ध धातू कुपी ठेवल्या. आयुष्याच्या अखेरीस इ.स. ६६४ मध्ये एकेदिवशी सर्व सूत्रांचे पठण झाल्यावर मैत्रेय बोधिसत्वाची स्रोते गात त्यांनी शांतपणे डोळे मिटले. Xuanzang’s travel to India not only gave new life to Chinese Buddhism, but also had an enduring effect on the Chinese literary imagination. म्हणून आज चीनमध्ये जो बहरलेला बुद्धिझम पहावयास मिळतो आहे तो फहियान, हुएनत्संग आणि इ-त्सीगं अशा त्यागी आणि ज्ञानी भिक्खुंमुळे आहे, हे ध्यानी असू द्यावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)
( संदर्भ : मा.श.मोरे यांचे ‘तीन चिनी प्रवासी’ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *