इतिहास

हुएनत्संगच्या पायवाटेवर – सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध

इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आणि संपूर्ण भारत बुद्धांच्या जयघोषाने निनादुन गेला. त्या धम्माची तत्वे त्यांना इतकी योग्य आणि तर्कनिष्ठ वाटली की त्यांनी त्याचा प्रसार सर्व भारतखंडात केला. बुद्ध चरित्राचे चिंतन मनन करून त्यांनी बुद्धांच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या स्थळी जाऊन स्वतः दर्शन घेतले व त्या स्थळाचे महत्त्व जनतेस कळावे म्हणून प्रत्येक ठिकाणी स्तूप, शिलालेख आणि स्तंभ उभे केले. अनेक ठिकाणी हे सर्व आज आपण पहात आहोत.

पण काही स्थळे अशी देखील आहेत जिथे उभारलेले स्तूप, शिलालेख आणि स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत तर काही स्थळांवर अतिक्रमणे झाले आहे. म्हणूनच भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांची पवित्रस्थळें अबाधित रहावी यासाठी अशा स्थळांवर नियमित जाणेयेणे झाले पाहिजे. आज आपण अशाच एका स्थळाची माहिती घेणार आहोत, जे विस्मरणात गेले आहे.

पाली साहित्यात, बर्मी ग्रंथात, ललित विस्तार आणि निदानकथा यात उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केल्यावर त्या रात्री अनेक योजने प्रवास करीत अनोमा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजेच गंडक नदी येथे आले व छन्नास म्हणाले “आता मी सर्वसंगपरित्याग करून परिव्राजिक जीवन सुरू करत आहे. तेव्हा तू आता माघारी फिर.” जड अंतःकरणाने छन्ना सारथी कंठक घोड्यासह माघारी फिरला. नंतर सिद्धार्थ गौतम यांनी एके ठिकाणी कंबल दान केली व दुसऱ्या ठिकाणी केशवपन केले. या स्थळांवर सम्राट अशोक यांनी मोठे स्तूप उभारले होते. कारण इथूनच त्यांचा ज्ञानप्राप्ती आणि बुद्ध होण्याचा प्रवास सुरू झाला होता. पाली सूत्तात म्हटले आहे की गृहत्याग केला त्या रात्री सिद्धार्थ यांनी शाक्य, कोलीय आणि मल्ल राज्यांच्या सीमा ओलांडल्या. तसेच ज्या ठिकाणाहून सिद्धार्थने छन्नास माघारी धाडले तेथे स्तूप असल्याचा उल्लेख ललितविस्तार, अभिनिष्क्रमण सूत्तात तसेच फाहियान आणि हुएनत्संग यांच्या प्रवास वर्णनात आहे.

परदेशातील म्युझियममध्ये असलेले सिद्धार्थ यांचे केशवपनाचे गांधारशिल्प.

फाहियान आणि हुएनत्संग यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात अंतरासहीत दिशासहित या स्थळाचा नामनिर्देश केल्यामुळे हे स्थळ शोधण्यासाठी नालंदा येथील दीपक आनंद यांनी ‘Rediscovering Buddha in Footsteps of Xuanzang’ या अभियाना अंतर्गत पुढाकार घेतला. व GIS सिस्टीम वापरून हे स्थळ शोधण्यास सुरवात केली. १४०० वर्षांपूर्वी हुएनत्संग कुठल्या मार्गाने आले त्याचा आढावा घेत व त्या मार्गाचा गुगल मॅप वरून मागोवा घेत ते बिहार मधील भवानगढी- वाल्मिकी नगर येथे जून २०२० मध्ये आले. तेथे गंडक नदी, भाताची शेते, दाट झाडी आणि आंब्याच्या बागा होत्या.

भवानगढी येथील अष्टभुजा असलेले सध्याचे मंदिर. मूळ स्तुपाचे नकाशा प्रमाणे ते तेथील स्तूप उंचवट्यावर उभारलेले दिसते.

दुसऱ्याच दिवशी उंच जागेवरील त्यांनी धार्मिक स्थळ बघीतले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. उभारलेले मंदिर आणि मठ एका उंचवट्यावर असल्याचा स्पष्ट पुरावा तेथे दिसत होता. पुरातन विटांचा वापर तेथील बांधकामात केला होता. तेथील जमीनदार प्रमोद सिंग यांची गाठ घेऊन त्यांना या जागेचे महत्व सांगितले तेव्हा त्यांना देखील आश्चर्य वाटले.

सागर माई उंचवटा येथील दगडी हत्ती शिल्प व केलेले देवस्थान

अशा तऱ्हेने गुगल मॅप पडताळून व आधुनिक पद्धती वापरून गंडक नदीच्या पलीकडील वाल्मिकी नगर मधील भवानगढी आणि सागरमाई (जेथे केशवपन केले) या दोन स्तुपांच्या जागांचा शोध लावण्यात आला. त्याची माहिती डॉ. सुजित नयन, उप पुरातत्व अधीक्षक, ऐजवाल सर्कल यांना देण्यात आली असून उत्खनन झाल्यावर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असे वाटते. मात्र जेथे छन्न सारथी सिद्धार्थ यांना सोडून माघारी फिरला तेथील स्तूप नदीचे पात्र वारंवार बदलत असल्याने नष्ट झाला असावा. कारण आता नदीचे पात्र ७ कि.मी. रुंद झाले आहे.

सागर माई उंचवटा – प्राचीन विटांचा ढीग येथे असून सिद्धार्थ यांनी येथे केशवपन केले.

नेपाळची सीमा येथून जवळ असून रामग्राम स्तूप सुद्धा जवळ आहे. अशी अजून कितीतरी स्थळें असतील जेथे सम्राट अशोक यांनी स्तूप, शिलालेख उभारले असतील पण सद्यस्थितीत त्याचा मागमूस सापडत नाही. म्हणूनच चिनी भिक्खू फहियान आणि हुएनत्संग यांचे भारतावर मोठे उपकार आहेत, ज्यांनी ५ व्या व ७ व्या शतकात भारतात धम्मयात्रा करून पाहिलेल्या बौद्ध स्थळांची, स्तुपांची माहिती अंतरासाहित आपल्या प्रवासवर्णनात नोंद करून ठेवली आहे. भिक्खू फहियान आणि हुएनत्संग यांना माझे नम्र वंदन.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “हुएनत्संगच्या पायवाटेवर – सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध

Comments are closed.