इतिहास

यशोधरेची यशोगाथा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते

बौद्ध धम्माच्या साहित्यामुळे बुद्धसमकालीन श्रावकसंघातील अनेक व्यक्तींचा परिचय होतो. असंख्य महाश्रावक, भिक्षुंणी, उपासक आणि उपासिका यांची माहिती मिळते. त्यातील एका भिक्षूणीची व्यक्तिरेखा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते. ही भिक्षूणी दुसरी तिसरी कोणी नसून सिद्धार्थ गौतम यांची पत्नी यशोधरा होय. बौद्ध साहित्यात त्यांच्याबद्दल जास्त कुठे लिहिलेले आढळत नाही. पुत्र राहुल याचे संगोपन करण्यात त्यांचे अर्धे आयुष्य खर्ची झाले असल्याने त्यांच्याबद्दलच्या गाथा जास्त आढळून येत नाहीत. पतीने घेतलेल्या निर्णयाला अनुमोदन देऊन पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांनी सुद्धा सर्वसंगपरित्याग केला. दुःख भावनेची कुठेही वाच्यता केली नाही. यावरून त्यांची धैर्यशीलता कळते.

यशोधरेच्या जीवनावर आधारित जगातील पहिला चित्रपट २०१८ मध्ये श्रीलंका येथे तयार झाला.

सिद्धार्थ गौतम ज्ञानप्राप्ती नंतर जेव्हा बुद्धत्व प्राप्त करून कपिलवस्तू येथे आले तेंव्हा यशोधरा यांचा बांध फुटला. त्या सैरभैर झाल्या. त्या प्रसंगाची अनेक लेखकांनी आणि कवींनी वर्णने केली आहेत. पुत्र राहुलला त्यांनी पित्याजवळ जाऊन आपला वारसा मागण्यास सांगितले. राहुल जेव्हा बुद्धांकडे गेला तेव्हा त्याला देखील त्यांनी संघात दाखल करून घेतले. यामुळे यशोधरा मनातून उन्मळून पडल्या असाव्यात. परंतु नंतर बुद्धांचा मावस भाऊ नंद आणि चुलत भाऊ आनंद यांनी देखील संघामध्ये प्रवेश केला. कालांतराने सावत्रमाता व मावशी महाप्रजापती गौतमी यांनीदेखील आनंदला सांगून बुद्धांचे मन वळविले व प्रवर्ज्या घेतली. यशोधरेने सुद्धा त्याच वेळेला प्रवर्ज्या घेतली. अशा तऱ्हेने भिक्षुणी संघ स्थापन झाला. यशोधरा यांनी नंतर उर्वरित आयुष्य ध्यानसाधनेत व्यतीत केले. संघाची सेवा केली. पुढे लवकरच त्या ध्यानसाधनेत परिपक्व झाल्या व अहर्त पद प्राप्त केले.

या गांधार कलाकृतीत राहुल याचे मुंडण करताना दाखविले आहे.

थेरी गाथेत यशोधरा यांच्या गाथा नाहीत. परंतु थेरी अपदानात यशोधरेच्या गाथा आढळतात. उपसंपदा घेतल्यानंतर त्यांचे नाव भद्दा कंच्चाना झाले. कठोर ध्यानसाधनेमुळे त्यांना दिव्यश्रोत, दुसऱ्यांचे चित्त जाणणे, पुनर्जन्म जाणणे, दिव्य चक्षु, आर्य सत्याचे ज्ञान व सिद्धी प्राप्त अशा सहा अभिज्ञा प्राप्त झाल्या. म्हणून त्यांना अभिज्ञालाभिणी असे देखील म्हटले गेले आहे.

अंतसमय जेव्हा जवळ आला तेंव्हा त्या बुद्धांना भेटावयास गेल्या. त्यांना वंदन करून त्या म्हणाल्या “तुमच्या पूर्वश्रमीची मी स्त्री आहे. मी आता थकून गेली आहे. जीवन थोडेच शिल्लक राहिले आहे. तुम्हास मी लवकरच सोडून जाईन. माझे निब्बाण मी प्राप्त केले आहे. आता काही करायचे बाकी नाही. या संसारात जर माझ्याकडून तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला क्षमा करा.” असे बोलून त्यांनी बुद्धांचा निरोप घेतला. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचे परिनिर्वाण झाले. त्या समयी त्या ७८ वर्षांच्या होत्या.

म्यानमार (ब्रह्मदेश) येथील हे जगप्रसिद्ध चित्र. राहुल हा बुद्धांजवळ आपला वारसा मागत आहे.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापूर्वी दोन वर्षे अगोदर यशोधरा यांनी या जगाचा निरोप घेतला. सर्वांवर उपकार करणारी, सुखदुःखात समानतेने राहणारी, दया व अनुकंपा दाखवणारी यशोधरेची मुक कहाणी बौद्ध साहित्यात अमर आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)