ब्लॉग

सन्मानाने जगा, सन्मानाने जगवा – यशवंत मनोहर

डॉ हर्षदीप कांबळे सर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ”दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट” याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले होते. त्यामध्ये त्यांनी करोना काळात बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन सर्वांना मदत करून दान पारमितेचे पालन करा असे त्यांचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज व्यक्तींनी डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या आवाहनाचे आणि प्रस्तावाचे स्वागत करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, कवी यशवंत मनोहर सर यांनी डॉ कांबळे सर यांच्या प्रस्तावाविषयी आपले मनोगत व्यक्त करून सदिच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा : दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट

प्रिय हर्षदीप कांबळे…
आपली दृष्टी ‘आम्ही भारताचे लोक’ एवढी सर्वसमावेशक आणि सर्वकरुणामय आहे याचा मला मनापासून आनंद झाला . आपल्या प्रस्तावाला हार्दिक सदिच्छा! ३१ मे रोजी फोनवर झालेल्या आपल्या चर्चेत एकदोन मुद्यांचा धावता ऊहापोह मी केला होता. त्या अनुषंगानेच मी माझे मनोगत आज विचारार्थ मांडतो आहे.

प्रथम मी हे नोंदवायला हवे की आपला हा प्रस्ताव किमान एक वर्षापूर्वी यायला हवा होता. असे झाले असते तर त्यानंतरच्या पाचसहा महिन्यात त्यावर आपणा सर्वांनाच काम करता आले असते , पण तरीही आपण म्हणता त्या सर्व गोष्टींची गरज संपली असे नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीची वेळ कधीही निघून गेलेली नसते.आपल्या प्रस्तावाला कोरोनाचे निमित्त आहे पण, या निमित्ताला जोडून आपण सेवेची आणि मदतीची नितांत गरज असलेल्या इतर संदर्भांचाही निकडीने विचार करायला हवा.

पूर, चक्रीवादळे, भूकंप आणि कोरोनासारख्या सामुदायिक संकटांमध्ये आणि स्त्रियांसह सर्वच दुर्बल घटकांवर होणा-या अत्याचारांच्या वेळी व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर सर्वच पीडितांना आर्थिक आणि मानसिक मदतीची गरज असते. शिवाय निराधार आणि गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनींना अनेक प्रकारची मदत हवी असते.काही मदत गरजूंना त्या त्या आपत्तीच्या वेळी करायची असते तर काही मदत निरंतर करायची आवश्यकता असते.

वरीलप्रमाणे मदत करण्यासाठी मोठ्या निधीची आणि बहुसंख्य सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज असते. कार्यकर्त्यांचे सैन्य उभे करण्यासाठी मोठी यंत्रणा हवी असते. या यंत्रणेने निधीचा डोंगर निर्माण करायचा असतो .यासाठी एक केंद्रिय व्यवस्थापन समिती आणि प्रत्येक जिल्ह्यात तिच्यासाठी निष्ठेने काम करणा-या तिच्या सुसज्ज शाखा निर्माण करण्याची आवश्यकता असते.

महानिधी असला तर ऐन वेळेवर काम अडत नाही. मदतकार्य करणारी पथकं वेळीच गरजूंपर्यंत पोचू शकतात. या पथकांनाही आवश्यक ती संसाथने मिळाली तर काम झपाट्याने होते. लोकांना काम प्रत्यक्ष दिसले तर दात्यांची संख्या वाढते. निधी वाढला की काम वाढते.काम वाढले की निधी वाढतो.सैन्याचा उत्साह वाढतो. लोकांचा उत्साह वाढतो आणि ‘जगा आणि जगवा ‘या सेवाभावी संस्कृतीचा विकास होतो. पारदर्शकतेतून विश्वासार्हता निर्माण होते. ही विश्वासार्हता कामाला आदरणीय इज्जत देते. ही इज्जत सामुहिक सौहार्द निर्माण करते.

हे पण वाचा : डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या महत्त्वाच्या घटनेकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले – उत्तम कांबळे

यातूनच ‘आम्ही भारतीय आहोत ‘ ही एकोप्याची वृत्ती विस्तारत जाते.लोकांना सर्वसमावेशकत्वाचा अनुभव आला की कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कामाला उदंड नैतिकता प्राप्त होते.अशी सर्वहिताय कामेंच माणसांना त्यांच्या निरामय माणूसमयतेशी जोडतात.

कोरोनाकाळात मुस्लिम,शीख आणि बौद्ध बांधवांनी केली ती कामे सर्वच भारतीयांसाठी भारतीय मनाने केलेलीच कामे आहेत. हेच खरे बौद्धत्व असते. बुद्धाला, बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतीय संविधानालाही अभिप्रेत भारत याच सर्वसमावेशक क्षितिजातून उगवतो.

तुमच्या प्रस्तावाला सदिच्छा! मी आहेच तुम्हा सर्वांसोबत.
धन्यवाद!

-यशवंत मनोहर
७ जून २०२१