बुद्ध तत्वज्ञान

तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी, त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये

बुद्धाने करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम. बुद्धाला असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी.

जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब योग्य प्रकारे स्पष्ट करून सांगितली. मैत्रीविषयी कथन करताना तथागत भिक्खुना उद्देशून म्हणाले. समजा, एखादा माणूस धरणी खोदतो तेव्हा धरणी त्याच्यावर क्रोधित होते काय?’ “नाही भगवन ’ भिक्खू उत्तरले “समजा, एखादा माणूस लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे चितारू लागला तर काय तुम्हाला असे वाटते की तो चित्रे चितारू शकेल? “नाही भगवन’.“का?” “कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येतील.” “त्याचप्रमाणे तुमच्या चित्तावरही काळे डाग असू नयेत. हे काळे डाग तुमच्या अपवित्र तृष्णेचे प्रतीक होत.”

“समजा एखादा माणूस हाती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यास निघाला तर त्याला ते शक्य होईल काय?” “नाही भगवन.” “का?” “कारण गंगेच्या जलात ज्वलनशीलता नाही.” आपल्या धम्मदेशनेचा समारोप करताना तथागत वदले, “ज्याप्रमाणे पृथ्वीला आहत (घायाळ) झाल्यासारखे वाटत नाही, ती क्रोधित होत नाही. ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कोणत्याही क्रियेची प्रतिक्रिया होऊ देत नाही, ज्याप्रमाणे गंगेचे जल अग्नीने विचलित होत नाही. तर निरंतर प्रवाहित राहते. त्याचप्रमाणे हे भिक्खुनो, तुमचा कोणी अपमान केला तरी, तुमच्यावर कोणी अन्याय केला तरी असे करणान्याप्रती तुम्ही मैत्रीभावनाच व्यक्त केली पाहिजे.”

“हे भिक्खुनो, मैत्री आणि मैत्रीची धारा निरंतर प्रवाहित राहिलीच पाहिजे. तुमचे चित्त पृथ्वीसम दृढ असावे, वायूसम निर्मल असावे, गंगेसम गहन गंभीर असावे. हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. तुम्ही असे कराल तर कोणत्याही अप्रीतीकर व्यवहाराने तुम्ही मैत्रीभावनेपासून विचलित होणार नाही. आणि जे तुमच्यावर आघात करतील, अन्याय करतील तेच शेवटी दमून जातील.”

“तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी. तुमच्या भावना, तुमचे विचार असीम असावेत. त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये.” “माझ्या धम्मानुसार करुणा आचरणेच पर्याप्त नाही. मैत्रीचे आवरण अनिवार्य आहे.”

संदर्भ- बुद्ध आणि त्यांचा धम्म
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

One Reply to “तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी, त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये

  1. सर्व प्राणी मात्रा विषयी सर्वांच्या मनामध्ये मैत्री भावना जागृत हो हीच सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *