मित्रांनो या फोटोतील व्यक्तीला खूप लोक विसरले असतील. यांचं नाव विलास ढाणे (पाटील), साताऱ्यातील जळगाव हे मूळ गाव होते. समाजवादी युवकदलाचा तो कार्यकर्ता. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराचं आंदोलन पेटलं होतं. सर्वत्र पुरोगामी चळवळीतील तरुण तरुणी, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून जोरदार आंदोलनात उतरले होते. विलासही त्यातलाच एक होता. मात्र सरकार ढिम्म हलत नव्हतं. अनेक राजकीय पक्ष सूडाचं राजकारण करत होते.
घरात नाही पीठ आणि यांना हवंय विद्यापीठ म्हणत होते. या सगळ्याने व्यथित झालेल्या विलासने २३ एप्रिल १९८२ या दिवशी स्वतःला रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. मराठवाडा विद्यापाठीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले जात नाही म्हणून मी आत्महत्या करीत असल्याचे शेवटचे पत्र त्याने डॉ. बाबा आढाव यांना लिहिले होते.
आज मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर याची मुद्दामहून आठवण झाली. नामांतराच्या लढ्यात मराठा समाजाने दलितांना त्रास दिल्याचे जाणीवपूर्वक अधोरेखित करणाऱ्या अनेकांना हे आवर्जून सांगावेसे वाटते की, विलास हा मराठा समाजाचा तरुण होता. सगळ्या गोष्टी काळ्या-पांढऱ्या रंगात बघायची सवय झालेल्यांना जातीअंताच्या लढाईत कॉ. शरद् पाटलांपासून ते बाबा आढाव यांच्यापर्यंत अनेकांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले, त्यात विलाससारख्या असंख्य तरुणांनीही जीवनदान केले आहे हे समजून घ्यावे लागेल.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येला आज सोशल मिडियाच्या काळात आपण वाया जाऊ दिले नाही. विलासच्या काळात सोशल मिडिया नव्हता आणि मेनस्ट्रीम मिडियाचे वर्ग व वर्ण चारित्र्य तेव्हाही आजच्यासारखेच होते. विलासचा त्याग तेव्हा अनेकांना माहित होता. काळाच्या ओघात त्यावर धुळीची पुटं चढली. कारण स्वतःला आंबेडकरी म्हणवणारेही जात बघुन कौतुक करू लागल्यावर विलासची आठवण राहणं शक्य नव्हतं. मराठा मोर्चाच्या निमित्ताने जाणीवपूर्वकच ही आठवण ताजी करत आहे.
-पै. लक्ष्मणशेठ गाडे