ब्लॉग

युथ आयकॉन : डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त….

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बौद्ध अनुयायांना बुद्ध धम्म शिकविणे आणि त्यांच्या अष्टांगिक मार्गाच्या आचरणातून बुद्ध संस्कृती निर्माण करणे हा धम्म मिशनचा केंद्रबिंदू होता. हाच धागा पकडून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे सर आज धमाचे कार्य करत असल्याचे आपल्याला त्यांच्या कृतीतून नेहमी दिसून येते. ते आपल्या कार्यात इतके मग्न झाले आहेत की ते १८ मे रोजी वयाची ५० वर्ष पूर्ण करीत असले तरीही १८ वर्षाच्या तरुणासारखे उत्साहात काम करताना दिसतात.

सरांचे प्रशासकीय कामकाज असो की, औरंगाबाद येथील जागतिक धम्म परिषद, त्यासोबत आज राज्यात कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हजारो गरीब गरजू लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे असो, डॉ.कांबळे सरांचा फोकस हा तरुणांवर असतो. सर तरुणांना सामाजिक आणि धम्म चळवळीत काम करण्याची संधी देऊन प्रोत्साहन देतात. आज सरांच्या माध्यमातून राज्यात विविध जिल्ह्यात कोरोना संकटामुळे गरीब कामगारांना अन्नधान्याचे किट्स वाटपाचे काम सुरु आहे. हे काम सुद्धा सरांनी तरुणांच्या माध्यमातून गरजू पर्यंत पोहचवत आहेत. बुद्ध तत्वज्ञानात दहा पारमिता आहेत त्यातील महत्वाची असलेल्या दान पारमितेच्या माध्यमातून कुशल कम्म करत आहेत. आमच्या सारख्या तरुणांना वेळोवेळी आचरणातून धम्म शिकवतात.

सरांची गेल्यावर्षी एक बातमी वाचली होती ”शेतकऱ्याच्या मुलाला आयआयटीचे शिक्षण देऊन अमेरिकेला पाठवले” तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे सुरज डांगे होय. सुरज ६ वीत असताना जिल्ह्या परिषदेच्या शाळेत एका कार्यक्रमात भाषण करत होता. त्याचे प्रभावी भाषण ऐकून सरांचे लक्ष वेधून घेतले. कांबळे सरांनी त्यातील टॅलेंट ओळखले. आज अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला आहे. असे अनेक विध्यार्थी सरांनी घडवले आहेत. आजही अनेक गरीब विद्यार्थांना सरांची मदत पोहचत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तरुणांना घडवत आहेत.

डॉ.हर्षदीप कांबळे सर आणि सुरज डांगे

औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने डॉ.कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म कार्याची संधी मला मिळाली होती. इतका भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजनाची तयारी करणे म्हणजे साधे काम नव्हते. या धम्म परिषदेच्या तयारीसाठी डॉ.कांबळे सर सहा महिन्यापासून तयारी करत होते. विशेष म्हणजे या धम्म परिषदेला तयारी करण्यासाठी तरुणांची संख्या अधिक होती. अश्या कार्यक्रमासाठी तरुण आणि तरुणींची संख्या आजपर्यंत कुठेच पाहण्यात आली नाही. डॉ.कांबळे सर यांच्या प्रत्येक धम्माच्या कार्यक्रमात तरुणांचा पुढाकार असतो हे विशेष…डॉ.कांबळे सर नेहमी म्हणतात सामाजिक आणि धम्म चळवळ तरुणांच्या हातात दिली पाहिजे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक धम्म कार्यात तरुणांची संख्या अधिक असते. त्यामुळेच आज कांबळे सरांची क्रेझ तरुणांमध्ये निर्माण झाली असून सर जिथे जातील तिथे त्यांच्या भोवती तरुणांची गर्दी होते.

डॉ.कांबळे सर यांनी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त जगाला हेवा वाटावा असा अभूतपूर्व जयंती कार्यक्रम घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबईत सुद्धा तरुणांचा पुढाकार होता. डॉ. कांबळे सर यांचे कार्य पाहून तरुणांत सुद्धा मोठा उत्साह निर्माण होतो. त्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात सर तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी मार्गदर्शन तर करतातच त्यासोबत राज्यातील अनेक तरुणांना उद्योजक बनविण्यात मोठे योगदान आहे.

नुकतेच ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने डॉ.कांबळे सर तरुणांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. विशेष म्हणजे या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाला ६० हजार युवकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात तरुणांनी सक्षम होऊनच सामाजिक आणि धम्म चळवळीत सहभागी व्हावे असे सांगिले. त्यासोबतच फेसबुक लाईव्ह संवादाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटानंतर तरुणांना असलेल्या संधी यावर सुद्धा मार्गदर्शन केले. त्यासोबत मुलांमधली क्रिएटिव्हिटी बाहेर येण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा सुद्धा घेण्यात येत आहे. टिक टॉकचा धम्म चळवळीसाठी योग्य वापर कसा केला पाहिजे या संदर्भात सुद्धा सरांनी छान माहिती दिली होती.

डॉ.कांबळे सर तरुण मुलांना नेहमी सांगतात की तुम्ही बुद्ध विचार आचरणातून स्वीकारले तर तुमचे आयुष्य सफल होईलच, यासोबतच तुमचे करिअरही यशस्वी होईल. पंचशीलाच्या विचारामुळे मनातील भीती नाहीशी होते. लपविण्यासाठी तुमच्याकडे काहीच नसते, तुम्ही दुप्पट जोमाने काम करू शकता. चांगल्या विचारांवर चालण्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते, याचा मला अनुभव आला आहे. प्रशासनात काम करतानाही मला या विचारांचा फायदा होतो. कितीही कठीण निर्णय असले, तरी ते मी सहजपणे घेऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक, प्रशासकीय कामांमध्ये, एकूणच सर्व कामांमध्ये बुद्धविचारांचा फायदा होतो.

डॉ.हर्षदीप कांबळे सर यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. ते आमच्यासाठी युथ आयकॉन असून त्यांच्या सोबत सामाजिक आणि धम्म चळवळीत धम्मसेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सरांच्या हातून असेच प्रशासकीय, सामाजिक,आणि धम्म कार्य होवो. सरांना चांगले आरोग्य लाभो अशी मंगल कामना!

जयपाल गायकवाड,नांदेड